
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे अबकी बार 220 के पार फेल गेलं आणि सगळीच सत्ता समीकरण बदललं. महायुतीतील भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेला जरी गेल्या वेळी पेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेनेला कमालीचं महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ता समीकरणात शिवसेना किंग मेकर ठरणार असून भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. आमदारांचा सत्तासमिकरणाबाबत कल जाणून घेण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर सर्व शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. याबैठकीत सत्तासमिकरणाचे विविध सूत्रावर चर्चा होणार असून आमदारांचा कल जाणून घेतला जाणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री, भाजपासोबत फिफ्टी फिफ्टी चा फॉर्म्युला, अडीच वर्षे मुख्यमंत्री पद, भाजपाकडून महत्वाची खाते मागून घेणे इत्यादी बाबींवर चर्चा होणार आहे. तसेच भाजपाने जर का सन्मानजनक सत्तेत वाटा न दिल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता समिकरणावरही चर्चा होणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. आज दुपारी बारा वाजता मातोश्री वर ही बैठक होणार असून सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या बैठकीवर केंद्रित झाले आहे. दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्याचे कळते.






