
मुंबई: महा विकास आघाडीच्या बैठकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून ठराव संमत करून शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. घराण्यातील तिसऱ्या पिढीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं. त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील एकमेव व्यक्ती ठरणार आहेत. २० वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.







