
कर्नाटक: कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १५ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या असून ६ जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागेवर आघाडी मिळाली असून काँग्रेसने पराभव मान्य केला आहे.
कर्नाटकात एकूण २२३ जागा आहेत. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११२ आमदारांची गरज होती. भाजपकडे सध्या १०५ आमदार आहेत. काँग्रेसकडे ६६ आमदार आहेत. तर जेडीएसचे ३४ आमदार आहेत. पोटनिवडणुकीत भाजपला १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास भाजपचे ११७ आमदार होतील. त्यामुळे राज्यातील येडीयुरप्पा सरकारला मोठा दिलासा मिळणार आहे. पोटनिवडणुकीत काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर आघाडी मिळालेली दिसत आहे. या पोटनिवडणुकीत मतदारांनी जेडीएसला सपशेल नाकारले आहे. त्यांना एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेस दोन जागांवर तर अपक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. भाजपने दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीत सहा जागांवर विजय मिळवल्याने येडीयुरप्पा सरकारला आता बहुमतात आले आहेत.






