पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नव्या वर्षापासून मोबाईल बंदी

पंढरपूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात १ जानेवारीपासून भाविकांना मोबाईल नेण्यास बंदीचा वादग्रस्त निर्णय भाजपच्या मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेत पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले असून भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाईल नेण्यास यापूर्वी शासनाने परवानगी दिली होती. आता पुन्हा समितीने आज हा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
मोबाईल ही भाविकांची गरज असल्याने वयस्कर भाविक आपल्यासोबत मोबाईल ठेवत असतात. मंदिर समितीने पूर्वी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यावर मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या नावाने पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. यात अनेक गैरप्रकारामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचाही दावा करण्यात आला होता. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठविल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठविण्यात आली होती.