‘इंडोस्कोपी ऑन व्हील’ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांनी आज विधानमंडळाच्या प्रांगणात एंडोस्कोपी ऑन व्हील्स म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचे उद्घाटन केले. श्री अमित मायदेव यांच्या संकल्पनेतली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब व गरजू रुग्णांना पोटविकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल असे त्यांनी सांगितले.

या केंद्रात अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे तसेच व्हॅनमधील २ तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशियन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचे निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, अॅसिडिटीची तपासणी आणि इतर वैद्यकीय सुविधा या केंद्राच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे.

रुग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात यासाठी ‘एंडोस्कोपी ऑन व्हील्स’ ची सुरुवात करण्यात आली असून राज्यभर हे केंद्र फिरणार आहे.