
मुंबई : उद्या सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देवून विरोधी पक्ष नेत्यांचे आरोपाचे खंडन केले.
उद्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे बोलत होते.
अधिवशेनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर होणाऱ्या सर्व आरोपांचं उद्धव ठाकरे यांनी आज खंडन केलं. आम्ही कोणतीही विकासकामं थांबवलेली नाही. आरे कारशेडमध्ये झांडांची रात्री-अपरात्री कत्तल करण्यात आली होती. झाडं तोडू नयेत असं अहवालात नमूद केलेलं असतानाही झाडं तोडण्यात आली. त्यामुळे आम्ही फक्त आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्या व्यतिरिक्त एकाही कामाल स्थगिती दिली नाही. आमच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून हिणवणाऱ्यांनी हिंमत असेल तर आम्ही स्थगिती दिलेल्या कामांची यादी सादर करावी, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. असा काही घोटाळा झाला असेल तर ही अत्यंत निंदणीय गोष्ट आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेण्यात आली असून माहिती घेऊनच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं सांगतानाच शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाल कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.
मुख्यंत्रिपदाची शपथ घेऊन १५ दिवस होऊ गेले आहेत. मात्र उद्या सरकारचं पहिलं अधिवेशन होत असून राज्याच्या उपराजधानीतूनच आमच्या सरकारची खऱ्या अर्थाने कारकिर्द सुरू होत आहे, असं सांगतानाच आम्हाला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यांच्या पाठबळावरच आम्ही राज्य करू. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू. आम्ही जनतेला बांधिल आहोत, विरोधी पक्षाला नाही, असंही ते म्हणाले.
उद्या अधिवेशन असल्याने सरकारच्यावतीने चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमाची प्रथा जुनीच आहे. आता त्यावर बहिष्कार टाकण्याची पोटप्रथा विरोधकांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे आज जागतिक चहा दिवस आहे. आपले पंतप्रधान कधी काळी चहा विकत होते. त्यांची ही पार्श्वभूमी सर्वांनाच माहीत आहे. ज्या पक्षाचा पंतप्रधान चहावाला होता, त्याच पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणं योग्य नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला.






