राज्यात हुडहुडी, मुंबई गाराठली; रात्री अजून पडणार थंडी

मुंबई: साधारणतः मकरसंक्रांतीच्या दिवसानंतर थंडी कमी होत जाते असे आतापर्यंत निसर्गाचे चक्र असायचे पण वातावरण बदलाचे परिणाम हिवाळा ऋतु सुद्धा अनुभवतोय. कालच्या मकरसंक्रांतीच्या दिवसानंतर थंडी वाढली आहे. मुंबईकरांना खऱ्या अर्थाने गारठवेल अशी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिवसादेखील कमाल तापमानाचा पारा घसरल्याने उन्हातही मुंबईकरांनी गारठा अनुभवला. रात्रीचा पारा आणखी घसरणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेने दिली आहे. विशेष म्हणजे आज रात्री मुंबईचं किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे, हे यंदाच्या हिवाळ्यातलं सर्वात कमी तापमान असणार आहे.

गेल्या तब्बल सहा दिवसांमध्ये मुंबईचं कमाल आणि किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत किमान तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त घट झाली आहे. गुरुवारी कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मुंबईच्या घसरलेल्या तापमानाची माहिती दिली.