U19 Cricket World Cup: भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय; सलग दहा विजयांचा विश्वविक्रम

साऊथ आफ्रिका: प्रियम गार्ग च्या नेतृत्वाखाली भारताचा U19 क्रिकेट संघ विजयी रथावर आरूढ झालेला पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघावर 74 धावांनी मात करून सलग दहा विजयाचा एक नवीन किर्तीमान स्थापित केला आहे.

उपउपांत्य फेरीच्या सामन्यात खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला पहिलं फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने 50 षटकात 9 बाद 233 अशी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलिया च्या संघाकडे पाहता ही धावसंख्या फारच कमी होती परंतु भारताचा वेगवान मारा ऑस्ट्रेलियन संघाला भारी पडला आणि त्यांचा संघ 43.3 षटकात अवघ्या 159 धावावर बाद झाला. भारताच्या वतीने वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कापून काढली. भारतीय संघाने 74 धावांनी ऑस्ट्रेलिया वर दणदणीत विजय मिळवला.

वेगवान गोलंदाज त्यागी याने 4 बळी मिळविले आणि त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकून एक नवीन विक्रम स्थापित केला. याआधी ऑस्ट्रेलिया व भारत या दोन संघाच्या नावावर सलग 9 सामने विजयाचा संयुक्तपणे विक्रम होता. आता मात्र केवळ भारतीय संघाच्या नावाने हा विक्रम स्थापित झाला आहे.