
नवी दिल्ली: 2106 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून 1 फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही हीच प्रथा सुरु आहे. काय स्वस्त होणार? काय महाग होणार? रेल्वेला काय मिळणार? शेतकऱ्यांना काय मिळणार? टॅक्स स्लॅब बदलणार की जैसे थेच राहणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.
काही दिवसांपासून रोजगार, देशाची ढासळती अर्थव्यवस्था, मंदी या सगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरत आहेत. मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या सगळ्याबाबत काही तरतुदी असणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालात 2020च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आर्थिक वर्षं 2021मध्ये अर्थव्यवस्था आणखी भक्कम होणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. आर्थिक सर्वेक्षणात जुलै-सप्टेंबर 2019मध्ये जीडीपी वाढ 4.5 टक्के राहिला आहे. जी 2013नंतर सर्वात नीचांकी स्तरावर राहिली आहे.
देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सगळी कडून ग्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला आजच्या बजेटमध्ये काही प्रमाणात राहत मिळणार का? देश आर्थिक मंदीतून बाहेर पडणार का? GST मध्ये काही बदल होणार का? शिक्षण, व्यापार, पर्यटन आणि शेतकरी यांना आजचा बजेट समाधान देइल का? हे लवकरच कळेल.










