U19: भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय, यशस्वी जयस्वालचे नाबाद शतक

अंडर 19 वर्ल्ड कप सध्या सुरू असून आज उपांत्य फेरीत हाय व्होल्टेज ड्रामा भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने भिडले. भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

उपांत्य फेरीत, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानच्या फलंदाजांना हा निर्णय योग्य सिद्ध करता आला नाही. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाला ५० षटकेही खेळून काढता आली नाहीत. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या संघाला ४३.१ षटकात फक्त १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.

पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या भारताच्या सलामीच्या जोडीने सावध सुरुवात केली. त्यानंतर जम बसल्यानंतर धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दरम्यान या दोन्ही फलंदाजांनी चांगले फटके खेळले. यशस्वी व दिव्यांशच्या जबरदस्त खेळीसमोर पाकिस्तानचे गोलंदाज हतबल झाले. पाकिस्तानच्या गोलंदाजांना निष्प्रभ केल्यानंतर भारताच्या सलामीवीरांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. यशस्वीने ११३ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. तर, दिव्यांश सक्सेनाने ९९ चेंडूत ५९ धावांची खेळी साकारली.