
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ मुंबईत 14 ते 28 जूनदरम्यान क्वारंटाईन राहणार आहे. श्रीलंका दौऱयावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या दिवसाआड सहा कोरोना टेस्ट (आरटीपीसीआर) होणार आहेत. ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी ही माहिती दिली.
विविध राज्यांतील क्रिकेटपटू चार्टर्ड प्लेनने येणार असून काही कमर्शियल एअरलाईनच्या बिझनेस क्लासने प्रवास करतील. मुंबईत दाखल झालेले सर्व खेळाडू सात दिवस आपापल्या रूममध्ये क्वारंटाईन राहतील. त्यानंतर ‘टीम इंडिया’च्या बायो-बबलमध्ये एकत्रित प्रवेश करतील. खेळाडू वेगवेगळ्या सत्रात जिममध्येदेखील सराव करणार आहेत.
भारत-श्रीलंका दरम्यान 13 जुलैपासून तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही होणार आहे. कोलंबोत गेल्यावर हिंदुस्थानी खेळाडूंना तीन दिवस हॉटेलमध्येच आपापल्या रूममध्ये राहावे लागणार आहे.
या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. टी दिलीप यांच्याकडे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक पदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. तसेच पारस म्हाब्रे हे गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहेत, अशी माहिती मीडियामधून समोर आली आहे.










