एअर इंडिया टाटा समुहाकडे?

मुंबई : ज्या एअरलाईन्सचा जेआरडी टाटांनी ८८ वर्षापूर्वी पाया घातला होता, ती पुन्हा टाटांची होणार असल्याचे दिसून येत आहे. अडचणीत आलेल्या एअर इंडियासाठी १७ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि टाटा समूह यासाठी आपली दावेदारी अंतिम करण्याच्या स्थितीत आहे. टाटा समूह सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून ही बोली लावण्यासाठी काम सुरू केले आहे.

४९ टक्के भागधारक असलेल्या मलेशियन उद्योजक टोनी फर्नाडिस यांच्याकडेही संपर्क करून एअर इंडिया एक्स्प्रेस खरेदी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. भागधारक करारानुसार फर्नाडिस तयार नसल्यास, टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये १० टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत.

सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नवीन करारावर स्वाक्ष-या होऊ शकतात. टाटा समूहाने एअर एशिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचा विलीनीकरण प्रस्ताव तयार केला आहे. या विलीनीकरणामुळे फर्नाडिसचा भारतीय विमानचलन क्षेत्रातील मोठा वाटा होईल, त्यामुळे दोन्ही पार्टनरचा विजय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.