
सरकारी वकील उज्ज्वल निकम खटला लढणार
हिंगणघाट : जळीतकांडाची घटना घडल्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त झाला होता. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर आता महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जळीतकांडासारख्या घटना कधी थांबणार? मुलींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन कधी बदलणार ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान आज सकाळी उपचाराच्या वेळी पीडित मुलीची प्रकृती खालावली व तिचा मृत्यु झाला. पिडीतीच्या नातेवाईकांनी जोपर्यंत गुन्हेगारास आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असं आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाने गावकारांची आणि नातेवाईकांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्यास तयार केले. हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला आमच्या स्वाधीन करा, त्याला गावातच आणा अशी उद्विग्न भावना दारोडा गावातल्या नागरिकांनी व्यक्त केली. आरोपीला गावात आणल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नसल्याचंही ग्रामस्थ सांगत आहेत. दारोडा गावात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी काल नागरिकांनी मुंडण आंदोलन केलं होतं.
हिंगणघाटच्या घटनेच्या खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय. तसंच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना हा खटला चालवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंगणघाट जळीतकांडातल्या पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारनं कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत






