
आय्योध्येला नक्की जा, तुमचं खरं रक्त जागं होईल- देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : ‘हिंमत असेल तर जनादेश तपासा आणि पुन्हा निवडणूक लावा’, असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. नवी मुंबईत भाजपकडून आयोजीत करण्यात आलेल्या दोन दिवसीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली. तसेच तिन्ही पक्षांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पक्ष समर्थ असल्याचही फडणवीसांनी ठासून सांगितलं.
2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल वचन बाळासाहेबांना दिलं होतं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करेन असं वचन बाळासाहेबांना दिलं होतं का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिलाय, तो विचार शिवसेना विसरली असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
भाजप यापुढे राज्यात स्वबळावर सत्ता परत आणेल असंही फडणवीस म्हणाले. तसेच आम्हाला सरकार पडण्याची गरज नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा. असेल हिम्मत तर या एकत्र अंगावर, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरुन उरु असं थेट आव्हान फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. तसेच हिम्मत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्याच्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचं कबूल करा, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान ‘अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचं खरं रक्त जागं होईल’, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदुत्वाचं रक्त जागं होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.











