जनमत चाचण्याचा कल : परत एकदा मोदी सरकार !

भारतीय लोकशाहीचा निवडणूक उत्सव अंतिम पर्व नुकताच समाप्त झाला आणि सर्वांनाच वेध लागले आहेत ते निवडणूक निकालाचे. संपूर्ण जगभरात याबाबत उत्सुकता असून जगभरातील अनेक देश भारतीय निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. आपण जर का विविध वृत्त वाहिन्या व संस्था यांच्या एक्जिट पोल नुसार पाहिलं तर लक्षात येईल की, भारतात परत एकदा मोदी सरकारच सत्ता स्थापनेचा दावा पेश करेल. जवळपास सर्वच वृत्तवाहिनी आणि संस्थांचे कल हे भाजपा प्रणीत सरकारच येईल असा अंदाज वर्तवीत आहेत. परंतु यंदा मात्र एक हाती सत्ता मिळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण ही निवडणूक मोदींना म्हणावी तशी सोपी जाणार नाही असच वाटत होत.

खर म्हणजे फक्त पाच वर्षामध्ये देशाचा कायापालट होईल ही अपेक्षा ठेवणच चूकीच आहे. अजून पाच वर्ष मोदी सरकारला सत्ता चालविण्यासाठी मिळणं गरजेचं आहे आणि तेवढच ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आपण जर का मागील पाच वर्षाचा मोदी सरकारचा कार्यकाल पाहिलं तर आपणास जाणवते की बर्‍याच योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम भाजपा प्रणीत मोदी सरकारने केले आहे. दळण वळण क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, रस्ता आणि वाहतूक, जलसंवर्धन, अंतराळ तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र यात भरीव कामगिरी मोदी सरकारने केली आहे. स्वच्छ भारत आणि डिजिटल भारतने तरच क्रांती केली आहे. कधी नव्हे इतके व्यवहार कॅश लेस व ऑनलाइन झाले आणि अनेक क्षेत्रातील दलालगिरी बंद झाली. लाभार्थीना त्यांचे लाभ थेट बँक खात्यात मिळण्यास सुरुवात झाली. विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती झटपट मिळण्यास सुरुवात झाली. अनेक महत्वकांशी प्रकल्प मार्गी लागले आहेत. मुंबई – गोवा हायवे असो किंवा मेट्रो रेल्वे प्रकल्प असो सर्वच क्षेत्रात वेगाने कार्य होत असल्याचे चित्र आहे. राहिला प्रश्न रोजगाराचा तर मोदी सरकार कार्यकाळात कधी नव्हे एवढे लघूद्योग निर्माण झाले. स्टार्ट अप इंडिया सारख्या योजांनामुळे अनेक होतकरू, मेहनती तरुणांना उद्योगधंद्यासाठी भांडवल मिळाले आणि त्यांचं आयुष्य बदललं. अनेक कर्ज योजनामुळे होतकरू उद्धयोजकांना सहज उद्योग धंद्यासाठी पैसा उपलब्ध झाला.

मुलींच्या शिक्षणासाठी तसेच महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजना लोकांपर्यन्त पोचल्या आणि त्याचा लाभ लोकांना घेता आला. शिक्षण क्षेत्रात अनेक क्रांतीकारी बदल झाले आणि अजून होतील. आरोग्य क्षेत्रात गरिबांसाठी वीमा योजना, शेतकर्‍यासाठी पीक वीमा योजना, पेन्शन योजना, सैनिकासाठी वन रॅंक वन पेन्शन योजना अशा प्रकारे किती तरी भरीव कामगिरी मोदी सरकारने केली आहे.

आपण मात्र काय चांगले बदल झाले हे न पाहता केवळ काही ठिकाणी योजना फसल्या असतील किंवा म्हणावे तेवढ्या प्रभावी ठरल्या नसतील तर त्याचाच जास्त बाऊ करतो आणि सरकार नाकाम अशी ओरड करतो. दहा पैकी दोन गोष्टी अपयशी ठरल्याअसतील म्हणून सरकारच अपयशी असा शिक्का मरण चुकीच ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने भारताची पत सुधारली आहे. भारताच्या भूमिकेला आणि भारतीयांना मान सन्मान मिळतो आहे, जग दाखल घेतो आहे, हे पूर्वी होत नव्हतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय व शस्त्रसज्जता मोदी सरकारच्या काळात पाहायला मिळाली. त्यामुळे जर का जनमत चाचण्याच्या अंदाजानुसार मोदी सरकार परत सत्ता स्थापन करत असेल तर ते भारताच्या आणि तमाम भारतीयांच्या हिताचेच आहे. आणि हे कदाचित येणारा काळ दाखवून देईल.

संपादकीय

किरण राणे