मुंबईत जीे एस टी भवनाला आग, अनेक कागदपत्रे जळून खाक

मुंबई: मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत. जीएसटी भवनच्या नव्या इमारतीला ही आग लागली आहे.

धूर येत असल्याचं समजताच इमारतीमधील कर्मचारी बाहेर पडल्याची माहिती इथे काम करणारे कर्मचारी सुशांत खोब्रागडे यांनी दिली. आगीत कोणीही अडकले नसल्याचं समोर येत आहे. तसंच इमारतीमधील बहुतांश साहित्य लाकडी असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. इमारतीमध्ये जीएसटीसंदर्भातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आगीमध्ये ती जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. स्पार्किंग झाल्याने आग लागल्याचं कळतं.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार घटनास्थळी पोहोचले आहेत. इथे ते घटनास्थळाची पाहणी करुन माहिती घेत आहेत.