
मेलबर्न: लेडी सेहवाग शफाली वर्माच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने ए ग्रुपमधील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेट आणि ३२ चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत लंकने भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या विजयासह भारताने ग्रुपमध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. चार विकेट घेणाऱ्या राधा यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
११४ धावांचे आव्हान भारताने सहज पार केले. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. स्मृतीला उदेशिका प्रबोधिनीने १७ धावांवर बाद केले. त्यानंतर शफाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागिदारी केली. कौर १५ धावा करून बाद झाली. दरम्यान शफाली अर्धशतकाजवळ पोहोचली होती. पण ४७ धावांवर ती धावबाद झाली. शफालीला अर्धशतक पूर्ण करता आले नसले तरी तिने संघाला विजयाजवळ पोहोचवले होते.











