
ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारताची फलंदाजी ढेपाळली. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्या यांच्या अर्धशतकी खेळी वगळता भारताच्या अन्य फलंदाजांना मोठी धाव संख्या करता आली नाही. कर्णधार विराट कोहील पुन्हा एकदा धावा अपयशी ठरला. भारताने पहिल्या डावात सर्व बाद २४२ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता ६३ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड अद्याप १७९ धावांनी पिछडीवर आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली. मयांकला ट्रेंट बोल्टने ७ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पृथ्वीने पुजारासोबत ५० धावांची भागिदारी केली. पण तो ही ५४ धावावर बाद झाला. पृथ्वी पाठोपाठ विराट कोहली ३ धावा करून माघारी परतला. तर अनुभवी अजिंक्य रहाणेला टीम साऊदीने ७ धावांवर बाद केले.
पुजारा-विहारी जोडीने पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी केली. त्यानंतर विहारीने कसोटीतील अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक झाल्या झाल्या तो ५५ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा देखील ५४ धावांवर बाद झाला. फलंदाजीतील ही अखेरची जोडी बाद झाली तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १९७ अशी झाली. त्यानंतर ऋषभ पंत १२, उमेश यादव शून्यावर, रविंद्र जडेजा ९ धावा करून माघारी परतले. त्यानंतर अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी २६ धावांची भर टाकली. बोल्टने शमीला बाद करत भारताचा २४२ धावांवर ऑल आऊट केला.
न्यूझीलंडकडून कायले जॅमिसन याने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन तर नील वॅगनर याने १ विकेट घेतली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा न्यूझीलंडच्या बिनबाद ६३ धावा झाल्या होत्या.











