कोरोना व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर, भारतात आढळले दोन रुग्ण

मुंबई: कोरोना व्हायरस जगभरात धुमाकूळ घालत असताना आता भारतातही दोन संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या वेशीपर्यंत आला असे म्हणावे लागेल. एक रुग्ण दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळला आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण हा एक नसून तेलंगणा आणि नवी दिल्ली अशा दोन ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, चाचणीमध्ये दोनही रुग्णांचे रिपोर्ट्स कोरोनाच्या लक्षणांशी मिळते-जुळते असल्याचं दिसून आलं. यातील एक रुग्ण इटलीहून तर दुसरा दुबईवरून भारतात आला असल्याचं समजत आहे. कोरोना व्हायरसवर तो बरा करण्यासाठी अद्यापही उपाय शोधला गेलेला नाही, त्यासाठी कोणत्याही अधिकृत उपचाराचा शोध लागला नाही. यापूर्वीही भारतात तीन संशयित रुग्ण आढळले होते, हे रुग्ण केरळ आणि पश्चिम बंगालमधील होते. मात्र तिघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. भारताच्या आरोग्यमंत्रालयाने या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.