
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना येणार यश
कल्याण – सद्या कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे.शंभरी पार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.अशातच करोना तपासणी लॅबची संख्या सध्या मर्यादित असून उपलब्ध लॅबवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे.
कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत असून त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, यासाठी खा. डॉ.श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते.
अशा प्रकारच्या लॅबसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन योजनेतून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी नार्वेकर यांनी मान्य केली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यावतीने आता सदर लॅबचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.






