

नवी दिल्ली / मुंबई : महाराष्ट्र राज्य आज कोरोनाच्या सावटत महाराष्ट्र दिन हीरक महोत्सव साजरा करीत असताना अशात एक सकारात्मक बातमी असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली होती आणि या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. यानिर्णयामुळे राज्यावरील अस्थिरतेचे वातावरण दूर झाले आहे.
कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. राज्यपालांनी तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी राज्यात नऊ जागांसाठी विधान परिषद निवणूक घेण्याकरिता विनंती अर्ज दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून आज केंद्रीय निवणूक आयोगाने तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित केली आणि विधान परिषद जागांसाठी निवडणूक घेण्याकरिता सशर्त परवानगी दिली.
एकीकडे राज्यावर करोनाचं संकट असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती.
त्यातच आता निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला आहे.
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली.
यानंतर हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा तिढा सुटला असून विधान परिषद निवडणूक 27 मे आधी होणार हे आता स्पष्ट झाले आहे.











