
मोहाली- गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झुंज देणारे तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे मानकरी बलबीर सिंग सिनिअर यांचे आज (सोमवारी) निधन झाले.
ते ९५ वर्षाचे होते. दीर्घ काळ आजारी असणाऱ्या सिंग यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीर सिंग सिनिअर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बलबीर सिंग यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सोमवारी सकाळी ६.३० वाजता सिंह यांचा मृत्यू झाला. बलबीर सिंग सिनिअर यांना ८ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील१६ महान ऑलिम्पियनपैकी बलबीर सिंग हे एक खेळाडू आहेत.











