
नवी दिल्ली – संविधानात सुधारणा करून देशाचे नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
२ जून रोजी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. देशाचे नाव हिंदुस्तान किंवा भारत करण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीयत्वाची मागणी वाढीस लागेल, असे मत या याचिकेत व्यक्त करण्यात आलेले आहे.
संविधानाच्या अनुच्छेद एक मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाच्या व्याख्येशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडियाच्या जागी भारत किंवा हिंदूस्तान शब्द वापरण्यात यावा, अशी मागणी याचिकेमध्ये आहे.
शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती, परंतु, सरन्यायाधिश शरद बोबडे अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी २ जूनला करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
इंडिया हे इंग्रजी नाव प्रतिकात्मक आहे. मात्र ते हटविल्याने राष्ट्रीयत्वाचा गौरव होईल.
येणाऱ्या पिढ्यांवर भारत किंवा हिंदूस्तान शब्दामुळे अतिशय सकारात्मक परिणाम होईल. इंडियाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरला गेल्यास देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या पूर्वजांना न्याय मिळेल, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.










