
एका वक्तव्यामुळे चिनी ड्रॅगन बिथरला
चिनी मालावर बहिष्कार टाका, भारतातल्या कारखान्यांमध्ये तयार झालेल्या जास्तीत जास्त वस्तू वापरा. चिनी स्वतःचा माल विकून मिळणारा पैसा भारताविरोधात सैन्याची ताकद वाढवण्यासाठी वापरतात….’, असं बरंच काही वांगचुक म्हणाला आणि अनेकांनी ते ऐकलं. वांगचुकच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी चिनी वस्तूंचा वापर बंद करायला सुरुवात केली. काही जणांनी मोबाइलमधील अनेक चिनी अॅप काढून टाकली. या घटना सुरू झाल्या आणि चीन बिथरला.
बिथरलेल्या चिनी ड्रॅगनने आपला संताप ग्लोबल टाइम्समधून जाहीर केला. चिनी मालावर बहिष्कार टाकणे भारतीयांसाठी कठीण आहे. भारतीय नागरिक दैनंदिन जीवनात एवढ्या मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू वापरतात की त्यांना चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून जगणे अशक्य आहे; असे मतप्रदर्शन ग्लोबल टाइम्समधील एका लेखात करण्यात आले. वांगचुक नावाचा माणूस आवाहन करत असला तरी त्याला अर्थ नाही त्याला जास्त प्रतिसाद मिळणार नाही, जो प्रतिसाद आहे तो तात्पुरता आहे; असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.
भारताला वांगचुकची ओळख आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटामुळे झाली. वांगचुकच्या लडाखमधील कामातून प्रेरणा घेऊन आमीर खानने त्याला हिंदी व्यावसायिक चित्रपटाचा मुलामा दिला आणि लोकांना वांगचुक समजला. पण तेवढ्या पुरताच. यावेळी मात्र परस्थिती बदलली. कोरोना संकट आले आणि लडाखमध्ये राहून निवांत जगणारा, मुलांवर चांगले संस्कार करणारा, त्यांना विचार करायला लावणारा हा अस्सल भारतीय इंजिनिअर नव्या व्हिडीओतून व्हायरल झाला.
इंजिनिअर सोनम वांगचुक. यंत्र निर्मिती करणारी बुद्धिमान माणसं घडवणारा हा इंजिनिअर. या इंजिनिअरची चीनला प्रचंड भीती वाटत आहे.
लडाखच्या एका माणसानं केलेल्या एका वक्तव्यामुळे चिनी ड्रॅगन बिथरला आहे. बिथरलेल्या ड्रॅगनचा संताप ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या ताब्यातील वृत्तपत्रातून जाहीर झाला आहे.











