
मुंबई – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ महाविकास आघाडी सरकारने बरखास्त केले आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांचे अध्यक्षपद गेले. दरम्यान, महामंडळामार्फत सुरु असलेल्या योजना निरंतर सुरु राहतील, असे महामंडळातर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमातील नियम 82(4) मधील तरतुदीनुसार महामंडळावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य व विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या शासनामार्फत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, महामंडळामार्फत सुरु असलेल्या योजना निरंतर सुरु राहतील. या योजनांतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या व्याज परताव्याचा लाभ यापुढे देखील निरंतर देण्यात येईल, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर नरेंद्र पाटील तर उपाध्यक्ष पदावर संजय पवार यांची नियुक्ती ३० ऑगस्ट २०१८ रोजी केली होती. तर, २० सप्टेंबर २०१९ रोजी महामंडळामध्ये संचालकांची नियुक्ती केली होती. त्यांची नियुक्ती रद्द केली आहे.
व्यवसायांसाठी १२१५ कोटींचे कर्ज वितरीत केले
महामंडळाच्या योजनांतर्गत १९००० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना विविध बँकांमार्फत विविध व्यवसायांसाठी १२१५ कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. या सर्व लाभार्थ्यांना महामंडळामार्फत ६१ कोटींची व्याज रक्कम लाभार्थ्यांच्या बचतखात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.











