सरकार आणि शेतकऱ्यांमधली बैठक संपली, पुढची बैठक 5 डिसेंबरला

कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधली बैठक संपलीय. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही.

आता 5 डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक घेण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी घेतलाय.

ही बैठक चांगल्या वातावरणात पार पडली आणि शेतकऱ्यांना जे आक्षेप होते त्या सगळ्या मुद्द्यांविषयी मोकळेपणाने चर्चा झाल्याचं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटल्याचं वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिलंय.

MSP आणि APMCमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय.

चर्चेतून तोडगा जरूर निघेल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचं धरणं आंदोलन संपुष्टात आणावं असं आवाहन त्यांनी केलंय.

दरम्यान दिल्लीतल्या विज्ञान भवनमध्ये झालेल्या या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी सरकारचा चहा आणि अन्न नाकारलं. यावेळी शेतकरी नेते स्वतः बांधून आणलेलं जेवण खाताना दिसून आले. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनी केला पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून त्यांनी आपला पुरस्कार परत केला आहे.

काल देखील शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा झाली पण ती चर्चा निष्फळ ठरली. विज्ञान भवनाबाहेर पोहचलेल्या शेतकरी प्रतिनिधींपैकी एक होते राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे संदीप गिड्डे. त्यांचे सहकारी शंखर दरेकर महाराष्ट्रातून त्याठिकाणी पोहचले होते. बैठकीत सुरू असलेल्या चर्चेची ते माहिती देत होते.