
सध्या जगात अनेक कंपन्या अशा लस बनवत आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीयांना मोठी खुशखबर मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute of India) लस ‘कोव्हिशिल्ड’ला (Covishield) भारतामध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने बनविलेल्या विशेष पॅनेलने हा निर्णय घेतला आहे. आता सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ची कोविड-19 वरील तज्ज्ञ समिती, ऑक्सफोर्डच्या कोव्हिशिल्ड अँटी-कोरोना विषाणूच्या लसीच्या वापरास मान्यता देण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे शिफारस करणार आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनकाद्वारा विकसित ‘कोव्हिशिल्ड’ लशीला केंद्र सरकारच्या एसईसीने (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी) आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे.
याच लशीला दोन दिवसांपूर्वी ब्रिटननेही आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.
काही अटींसह कोव्हिशिल्डला मंजुरी देण्यात येत असली तरी भारतात मंजुरी मिळणारी ही पहिलीच लस ठरली आहे.
लशीच्या वापरासंदर्भात अंतिम निर्णय डीसीजीआई संस्था घेणार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाव्यतिरिक्त फायझर, भारत बायोएन्टेक या कंपन्यांचेही लशीसाठी प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत.











