
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात.
बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते.
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा सहव्याधी म्हणजेच मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग असलेल्या लोकांना अधिक आहे. कोव्हिड-19 ची लागण झालेल्यांपैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेकजणांचा कोव्हिड बरा होत आहे पण तरीदेखील त्यांना या व्याधींचा त्रास होत आहे.
मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात, “सोप्या शब्दात सांगायचं झालं. तर, म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे.”
तज्ज्ञ सांगतात, बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो. सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहाते. “ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते,” असं डॉ. चव्हाण पुढे सांगतात.
‘म्युकर मायकॉसिस’ आजाराची लक्षणं?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी रुग्णांनी आजाराची लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे नाक-कान घसातज्ज्ञ डॉ. शरद भालेकर या आजाराची चार प्रमुख लक्षणं सांगतात.
· नाकातून रक्त येणं
· मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी
· डबल व्हिजन म्हणजे, एखादी गोष्ट दोन दिसून येते
‘म्युकर मायकॉसिस’ ची कारणं?
डॉ. चव्हाण म्हणतात, “रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.”
मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयाच्या फिजीशिअन डॉ. हनी सावला ‘म्युकर मायकॉसिस’ची चार प्रमुख कारणं सांगतात.
· अनियंत्रित मधुमेह. शरीरातील सारखेचं अनियंत्रित प्रमाण
· स्टीरॉईडचा अतिरिक्त किंवा गरजेपेक्षा जास्त वापर
· ब्रॉड स्पेक्ट्रम एन्टीबायोटिक्स
· शरीरातील न्यूट्रोफिल्स कमी होणं
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना हा आजार होत असल्याने, सर जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिनी पारेख म्युकर मायकॉसिसला संधीसाधू आजार म्हणतात.
डॉ. भालेकर याची कारणं सांगतात,
· कोरोनारुग्णांची उपचारादरम्यान कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती
· कोव्हिड रुग्णांना दिले जाणारे स्टीरॉईड्ज
· शरीरातील व्हायरसची संख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध
“कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो,” असं ते म्हणतात.
नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत आहे. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
या आजारावरील औषध महागडे असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
म्युकर मायकोसिस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून त्याची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.
या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.











