बारावीच्या परीक्षा एप्रिल मध्ये तर दहावीच्या परीक्षा मे महीन्यात होणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणू आहे, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती पाहू आणि त्यानंतर पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करु. सीबीएसईने जसं परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

तशाच प्रकारे आम्ही सुद्धा १५ एप्रिलनंतर १२वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा आणि १ मे नंतर दहावी बोर्डाची परीक्षा घेण्याच्या संदर्भात विचार करत आहोत”.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन २३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, नंतर शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा अशा सूचना करण्यात आल्या. यानंतर सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. मुंबई, ठाणे महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील शाळा १५ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा बंद असल्या तरी या काळात शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, बोर्डाच्या दहावी (SSC exams) आणि बारावीच्या परीक्षा (HSC exams) कधी होणार? असा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडलेला होता. यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्वाची माहिती देवून विद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही तयारीला लागणार आहेत.