महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि विद्यापीठे 50 टक्के विद्यार्थ्यांसह 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार

सरकारने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये (Maharashtra Colleges and Universities) 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील.

महाराष्ट्र सरकारकडून बुधवारी, 50 टक्के विद्यार्थ्यांसह महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासह महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की, चालू शैक्षणिक वर्षासाठी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करणारा नियमही सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

50 टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार लवकरच ‘एसओपी’ची यादी जारी करणार आहे.

कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करावीत. नियमित वर्ग घेण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महाविद्यालये सुरु करताना कोविड-19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे.

वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतिगृहाचे इलेक्ट्रिक व सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे.