
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.
हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 जानेवारी) वर्षा येथे कोरोना लसीकरणाबाबत बैठक घेतली तसेच ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं, की ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते मात्र. गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे.
नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले 8 प्रवाशी सध्या संस्थात्मक विलगिकरणात असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांचा संपर्क कुणाकुणाशी आला ते काटेकोरपणे शोधण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी वर्षा येथील बैठकीत दिली.
कोरोना लसीकरणाची ड्राय रन नुकतीच झाली. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.











