सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अनाथांची माय म्हणून ओळख मिळवलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी वाहून घेतले आहे.

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंधुताई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी एक धक्काच आहे. कारण माझे शिक्षण चौथी पासपर्यंतच झाले आहे. यामुळे हे कसे शक्य झाले? मला माहिती नाही. मी समाजकार्यात अनाथ मुले आणि महिलांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्वजण माझ्यासोबत राहू लागले. दरम्यान, मी त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम केले. मला या प्रवासात समाजातील सर्वांनी सढळ हाताने मदत केली. मी त्यांना हा पुरस्कार अर्पण करते, असे सिंधुताई सपकाळ लोकसत्ताशी बोलताना म्हणाल्या आहेत.

दरम्यान, भारतरत्न पुरस्कारानंतरचे पद्म पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना केंद्र सरकारतर्फे गौरवण्यात येते. 

1954 पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. या पुरस्कारांना पद्म विभूषण (Padma Vibhushan), पद्मभूषण (Padma Bhushan) आणि पद्मश्री (Padma Shri) अशा तीन प्रकारात विभागले गेले आहे. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी सात जणांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, गायक एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.

सात लोकांना पद्मविभूषण, दहा जणांना पद्मभूषण आणि 102 व्यक्तींना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे.