
महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. असं असलं तरी आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष निधी मिळवण्यात मोठी झेप घेतली आहे. पक्षाला देणगी देणारे दाते मिळवण्यात राष्ट्रवादी चांगलीच यशस्वी झाली असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झालं आहे.
निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या देणगी अहवालानुसार, २०२०-२१ साली भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्सने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५ कोटींची देणगी दिली. राजकीय पक्षांना दरवर्षी २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाल्यास त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाला सादर करावी लागते.
आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष निधीमध्ये ५९.९४ कोटी रुपयांची भर पडली आहे. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात ही आकडेवारी १२.०५ कोटी होती. म्हणजेच नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निधीत जवळपास पाच पट वाढ झाल्याचे समोर आले आहे.










