लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या ट्वीटची चौकशी होणार- अनिल देशमुख

गेल्या 70 दिवसांपासून लाखोच्या संख्येने शेतकरी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करत आहेत. 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला.

पॉपस्टॉर रिहानाने 2 फेब्रुवारी रोजी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट केलं. सीएनएनच्या एका बातमीची लिंक शेअर करत ती लिहिते, “आपण या विषयावर का बोलत नाही?” या ट्वीटमध्ये त्यांनी #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.

रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय. तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केलं.

त्यानंतर भारताचे अनेक सेलिब्रिटी रिहानाविरोधात एकवटले. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने ट्वीट करून म्हटले आहे की बाहेरच्या देशातील व्यक्तीला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

अजय देवगण, कंगना राणावत, अक्षय कुमार या सेलिब्रिटींनी देखील रिहानावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसकडून या ट्वीटच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

“शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षानं त्यांना प्रवृत्त केलं होतं का? भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का?” असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

शेतकरी आंदोलनाप्रकरणी बॉलीवूड सेलिब्रिटी आणि नॅशनल हिरोंवर ट्विट करण्यासाठी दवाब टाकण्यात आला होता का, याची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे.

सेलिब्रिटींवर ट्वीट करण्यासाठी दवाब होता का, याची गुप्तचर विभागाकडून चौकशी केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी (8 फेब्रुवारी) अनिल देशमुख यांच्याशी झूमवरून चर्चा केली. यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले.