राज्यात कोरोनाचं संकट परत वाढतंय, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा मुंबईकरांना इशारा

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून गेल्या २ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यानंतर आता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील आज (१६ फेब्रुवारी) कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

किशोरी पेडणेकर याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “वाढती कोरोना रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. अनेक लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी याबाबत खबरदारी घ्यायला हवी नाहीतर आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ. त्यामुळे लॉकडाऊन लागू व्हावा की नाही?, हे आता सर्वस्वी लोकांच्याच आहे”, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर वाढला असून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका प्रशासनाला चेंबूरमधील एका वार्डात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे, राज्यासह मुंबईत देखील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.