
फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसांमध्ये नुवी मुंबईत 2 हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 805 वरून 1040 वर पोहोचली आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या देण्यात आलेली शिथिलता व करोना संसर्ग कमी होत गेल्याने नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्ती आणि त्यात एपीएमसी बाजारात नियमांची होणारी पायमल्ली यामुळे करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिवाळी ते 31 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. दिघा, इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. परंतु 1 फेब्रुवारीला रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.
एक महिन्यापूर्वी प्रतिदिन 40 ते 60 रुग्ण वाढत होते. सद्य:स्थितीमध्ये हे प्रमाण 80 ते 100 झाले आहे. एक महिन्यात शुक्रवारी प्रथमच एकाच दिवशी 109 रुग्ण आढळले आहेत.
रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून नवी मुंबई मनपा क्षेत्रात तब्बल 2 हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही नागरिकांना विसर पडला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही रुग्णवाढीची गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
आज नवी मुंबईत एका दिवसात ११६ रुग्ण आढळले आहेत. मागील तीन दिवस रुग्ण संख्या सातत्याने शंभरच्या वर आढळून येत आहे.











