मुंबईत कोरोना संसर्ग वाढत असला तरी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय नाही – सुरेश काकाणी

मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना संसर्ग वाढल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सध्यातरी मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा विषय अजेंड्यावर नसल्याचंही काकाणी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ८ दिवसांचा अल्टिमेटम नागरिकांना दिला आहे.

सुरेश काकाणी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. सध्या मुंबईत ८२ टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. फक्त १८ टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत, असं काकाणी यांनी सांगितलं आहे.

मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमलबजावणी करावी. त्यांनी कोरोना नियमाची काटेकोर अमलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. तसेच संचारबंदी लागू करण्याचा विषयही अजेंड्यावर नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.