कुठे आहे कोरोना? लोकलमध्ये दररोज 40 लाख प्रवासी, ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा फज्जा

कोरोना लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून लोकलसह रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर 15 जूनपासून अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी उपनगरीय लोकलच्या फेर्या मर्यादित प्रमाणात सुरू करण्यात आल्या. त्यावेळी कोरोनामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी प्रत्येक लोकलमागे केवळ 700 प्रवाशांची परवानगी देण्यात आली होती.

राज्य सरकारची तसेच केंद्र सरकारची अत्यावश्यक कर्मचार्यांची पालिकेने जारी केलेली आकडेवारी पाहून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रोजच्या फेऱयांचे नियोजन केले होते.

मात्र, आता हे बंधन पाळले जात नसल्याने कोरोना वाढल्याचे म्हटले जात आहे. फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना लोकलची दारे खुली करण्यात आली आहेत. कमी गर्दीच्या वेळेत सर्वसामान्यांना प्रवासाची मूभा देण्यात आली आहे. मात्र, यामुळे उपनगरीय मार्गावरील महत्त्वाची स्थानके प्रवाशांच्या गर्दीने ओसंडू लागली आहेत.

मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 20 लाख तर पश्चिम रेल्वेवर 17 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवासाची मंजूरी दिलेल्या नॉक पिकअवरमधील गर्दी प्रचंड वाढून कोरोनासाठीचे सामाजिक अंतर राखणे कठीण जात असून ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा पुरता फज्जा उडाला असल्याचे पाहायला मिळत आहे.