गरज भासल्यास 1 मार्चपासून शाळा बंद ठेवा – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

राज्यातील काही जिह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत 1 मार्चपासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

जिह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत स्थानिक प्रशासनाने पाचवी ते आठवी तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. तसेच ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्या शाळेत आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी शाळेतील 4 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे 229 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक बाब आज समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात काही जिह्यांतील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. समाजकल्याण आणि आदिवासी कल्याण विभागाशी यासंदर्भात चर्चा सुरू असून याबाबत राज्यातील सर्व जिह्यांच्या शिक्षणाधिकाऱयांकडून जिल्हानिहाय कोरोनाचा आढावा घेत असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.