
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रज यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Language Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
वि. वा. शिरवाडकर यांनी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन केलं. त्यांचा जन्म पुणे येथे झाला होता. त्यांनी नासिक येथे आपले शिक्षण पूर्ण केले. कुसुमाग्रज यांनी 1934 ते 1936 या काळात चित्रपटव्यवसायात काम केले. त्यानंतर त्यांनी पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून काम केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, हिमरेषा, वादळवेल हे कुसुमाग्रज काही प्रकाशित काव्यसंग्रह आहेत.












