
बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे की मिथुन चक्रवर्ती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकातामध्ये होणाऱ्या रोड शोला हजेरी लावणार आहेत. भाजपकडून मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.
पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले की ‘जर मिथुन हे भाजपमध्ये आले तर ते बंगाल आणि भाजप दोन्हीसाठी चांगली गोष्ट असेल, जर त्यांनी पंतप्रधानांसोबत मंचावर हजेरी लावली तर बंगालमधील जनतेला आनंदच होईल’.
2014 साली मिथुन यांना तृणमूल काँग्रेसने राज्यसभेवर पाठवलं होतं. डिसेंबर 2016 पर्यंत ते खासदार होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान 27 मार्चला होणार असून निकाल 2 मे रोजी लागणार आहे. या निवडणुकीपूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सेलिब्रिटींना आपल्या पक्षात सामील करून घेण्याची चढाओढ लागली आहे.






