England Vs India Test Match: भारताचा धमाकेदार विजय, इंग्लंड संघाचा एक डाव आणि 25 धावांनी दारुण पराभव

अहमदाबादच्या (Ahmedabad) चौथ्या कसोटीत सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) दबदबा कायम ठेवला आणि इंग्लंडचा (England) दारुण पराभव करत एक डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला. 

भारताने पहिल्या डाव्यात 160 धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लिश संघाचे फलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. शिवाय, सामन्यासह टीम इंडियाने चार सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1 ने जिंकली आहे. इंग्लंडने मालिकेची विजयी सुरुवात केली, पण अखेरचे तीन सामने यजमान संघाने आपल्या नावावर केले आणि एकतर्फी विजय मिळवला. 

इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने (India) तिसऱ्या दिवशीच 3-1 असा मालिकेवर शिक्कामोर्तब केला आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. 

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल करत इंग्लिश संघाला गुडघे टेकण्यास भाग पडले. भारतीय संघाच्या या फिरकी जोडीने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती आणि इंग्लंड दुसऱ्या डावात 135 धावांपर्यंत मजल मारू शकली ज्यामुळे यजमान संघाने घरच्या मैदानावरील आपली घोडदौड सुरु ठेवली. टीम इंडियाने चौथ्या अहमदाबाद टेस्ट सामन्यासह चार सामन्यांची मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. 

दरम्यान, जो रूटच्या इंग्लिश टीमविरुद्ध चौथ्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने फक्त मालिकाच खिशात घातली नाही तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्यातही धडक मारली. आता जून महिन्यात इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी लढत होईल.