
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाची दुसरी लाट आली असून यात अनेकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे देशातील राजकारण देखील दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. औषधे, ऑक्सिजन यांचा अपुरा पुरवठा, यामध्ये होत असलेले राजकारण हे लोकांना उघडरित्या दिसत आहे.
या सर्वांवर टिप्पणी करत मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. यात तिने देशातील घाणेरड्या राजकारणावर भाष्य केले आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, “सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या “कीड”पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच…काळजी घ्या.”











