Unlock: चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार ?

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यांतील कोरोनाची स्थिती लक्षात घेता त्यानुसार, निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान चंद्रपूर (Chandrapur) जिल्हयात येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

त्यानुसार, अत्यावश्यक तसेच अन्य सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. यात नागरिकांना कोरोना नियमांचे आणि त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे.

संपूर्ण जिल्हयातील अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची एकल दुकाने, आस्थापना (मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सुपर बाजार, सलून, स्पा-जिम इत्यादी वगळून) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. सदर एकल दुकाने, आस्थापना शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी संपुर्णत: बंद ठेवण्यात येतील.

जिल्हा अंतर्गत अत्यावश्यक सेवा, वस्तू तसेच अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर प्रकारची सेवा, वस्तू ई-कामर्सच्या माध्यमातून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत वितरीत करण्यास परवानगी राहील. नागरिकांना दुपारी 3 या वेळेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणी प्रसंग तसेच घरपोच सेवा या कारणांशिवाय बाहेर येण्या-जाण्यावर निर्बंध असतील. राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील.