
अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील ब्रिटिशकालीन जीर्ण पूल खचून रात्री साडेआठच्या सुमारास कोसळला. या पुलावरून मोटासायकल तसेच एक चारचाकी वाहन जात असतानाच पूल दुभंगला आणि गाडय़ा प्रवाहात कोसळल्या. कारमधील चार जणांना बाहेर काढण्यात यश आले, तर मोटरसायकलस्वाराचा मात्र मृत्यू झाला. या घटनेमुळे मुरुडकडे जाणारी आणि अलिबागकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. मुरुडकडे जाण्यासाठी पर्यायी सुपेगावमार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
काशीद येथील हा ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. मात्र संबंधित खात्याचे त्याकडे दुर्लक्ष होते. त्यातच आज सकाळपासून मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. रात्री साडेआठच्या सुमारास कमकुवत झालेला हा पूल कोसळला. या पुलावरून त्याच वेळी एक कार आणि एक मोटरसायकलस्वार जात होता. कार आणि मोटरसायकल प्रवाहात कोसळली. उपस्थितांनी कारमधून पाण्यात पडलेल्या चौघांना वाचवले. मोटरसायकलस्वाराचा मात्र बुडून मृत्यू झाला.






