IND vs ENG 4th Test Day 2: ओव्हलवर इंग्लंडची पहिल्या डावात 99 धावांची आघाडी , दिवसाखेरीस दुसऱ्या डावात भारताच्या बिनबाद 43 धावा

इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रिटिश संघाने ओली पोप (Ollie Pope) आणि अष्टपैलू क्रिस वोक्सच्या (Chris Woakes) दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारली आणि भारतावर 99 धावांची आघाडी घेतली.

प्रत्युत्तरात भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma)-केएल राहुल (KL Rahul) जोडी मैदानात उतरली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित 20 धावा आणि राहुल 22 धावा करून खेळत होते. दुसऱ्या दिवसाखेर भारताने बिनबाद 43 धावा केल्या असून ते अद्याप इंग्लंडच्या 56 धावांनी पिछाडीवर आहेत.

दुसरीकडे, इंग्लिश संघ अडचणीत असताना पोपने फलंदाजीची धुरा सांभाळली आणि सर्वाधिक 81 धावा ठोकल्या तर वोक्सने भारतीय गोलंदाजांना त्रास देत अंतिम क्षणी 50 धावा लुटल्या. तसेच जॉनी बेअरस्टोने 37, मोईन अली 35 आणि डेविड मलाने 31 धावांचे छोटेखानी योगदान दिले.

भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यानंतर उमेशने भारताकडून तब्बल आठ महिन्यानंतर पहिला कसोटी सामना खेळला आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबक शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली.