
भारतीय संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. भारतीय संघाने एकप्रकारे आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. लखनौच्या मैदानावर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना जिंकताच, संघाने सलग दहावा T20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. अशा प्रकारे भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने सलग 9 सामने जिंकले होते.
भारतीय संघ शेवटचा T20 विश्वचषक 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकले आहेत. 2021 च्या T20 विश्वचषकात भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला आणि त्यानंतर T20I मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 ने विजय मिळवला आणि सलग 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या त्यांच्या स्वत:च्या विक्रमाची बरोबरी केली, तर श्रीलंकेला हरवून भारताने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 सामने जिंकण्याची पहिलीच वेळ आहे. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
रोहित शर्माने टीम इंडियाची कमान नियमितपणे हाती घेतल्यापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि तेव्हापासून त्याने भारताला सलग 10 विजय मिळवून दिले.
गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 62 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) दोन बाद 199 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ सहा विकेट्स गमावून फक्त 137 धावाच करू शकला. भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकता आला असता, पण भारतीय क्षेत्ररक्षकांच्या खराब कामगिरीमुळे तसे होऊ शकले नाही. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षकांनी अनेक सोप्पे झेल सोडले. याबाबत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे की क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यावर काम करतील.










