मला भावलेल्या शांतताप्रिय कॅनडा: डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – ४

कॅनडातील कुशल, अकुशल कारागीर आणि त्यांची कार्यप्रणाली

कॅनडातील कुशल, अकुशल कारागीर आणि त्यांची कार्यप्रणाली: मुंबई नगरी बांका तिचा सर्वत्र वाजे डंका अशा आशयाचे शाहीर अमर शेख यांचे एक कवन मला पुसटसचे आठवते .मुंबईत जो येतो आणि कष्ट करण्याची तयारी दाखवितो तो कधीही उपाशी राहू शकत नाही.

मी सुरुवातीलाच मुबंईचे उदाहरण का देतोय ते या आजच्या टिपणातून आपल्या लक्षात येईल. कॅनडातील शैक्षणिक सुविधा तसेच नोकरी, उद्योग व्यवसायाची संधी याचबरोबर येथे कुशल अकुशल कारागीरांची प्रचंड मागणी ही बाब लक्षणीय आहे. जसे दुबईत आखाती देशात भारतीया बरोबर श्रीलंका,बांगलादेश, पाकिस्तान, नेपाल इत्यादी देशातील इंजिनिअर्स, वास्तुविशारद, तंत्रज्ञ आणि श्रमजीवी मोठमोठाले प्रकल्प, रस्ते,पूल, इमारती निर्मीतीत योगदान देत असतात तशीच परिस्थिती आज कॅनडातही आहे असे माझ्या निरीक्षणातून दिसून आले.

येथे प्रामुख्याने मी जे भारतीय त्यातही शीख बांधव या व्यवसायात अग्रेसर आहेत त्यांच्या विषयी लिहीत आहे. तसे पाहिले तर चीनी लोकही या कामात माहिर आहेत. आफ्रिकन लाकूड काम व इतर रफ कामासाठी तसेच गोरे ठेकेदारही आहेत मात्र त्यांचे रेट इतरांपेक्षा खूपच जास्त असतात.

मी येथे पंजाबी शीख व इतर भारतीय कामगारांवर फोकस टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.याचे कारण राहुलच्या बेसमेंट मध्ये गेले कित्येक दिवस नूतनीकरणाचे काम चालू आहे त्या ठेकेदाराशी,त्याच्या टिम मधील कामगाराशी मी संवाद साधून बरीचसी माझ्या ज्ञानात भर घातली आहे.

Dr Bhaskar Dhatavkar

येथे ठेकेदार कामे स्विकारतात त्याचे लेखी करार वैगरे काही करीत नाहीत .चेकनी रक्कम घेत नाहीत,सर्व मामला फक्त रोखीचा. सारे काही विश्वासावर चालते.ऑनलाईन किंवा चेकनी व्यवहार झाल्यास येथे चाळीस टक्के टॅक्स द्यावा लागतो. अ‍ॅडव्हान्स घेतल्याशिवाय सुरुवात करीत नाहीत आणि मग त्यांच्या मर्जी प्रमाणे कि सवडीनुसार यथावकाश काम सुरू करतात. प्रत्येक वर्कर स्वताच्या महागड्या कार्स मधून येतात.आपल्याशी हिंदीतून, गरज असेल तर हायफाय इंग्रजीतून बोलतात.ठेकेदार हे शासन मान्य लायसन्स होल्डर असतात.बांधकाम किंवा सुतारकामे आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने करतात. खोदकामासाठी मशीन, मोठी खोदाई असल्यास छोटा जेसीबी,त्यांच्या मदतीनेच भली मोठी सिमेंट, रेतीची घाणी तयार करणे,लाकूड कापणे,वाॅटरबाॅटल लेव्हलींग अशी अनेक उपकरणे ते लिलया हातालीत असतात. झटून काम करतात.

कोणीच काम चुकार पणा करीत नाहीत. येथे समर मध्ये रात्री नऊवाजे पर्यंत लख्ख प्रकाश असतो त्यामुळेच ते अथक पणे आपल्या कामाचे टार्गेट पूर्ण करतात.

सर्व रॅबीट प्रथम कंटेनर मध्ये साठवून नंतर तो कंटेनर व्यवस्थित जाळीने झाकून ( रस्त्यात किंवा हाय वे वर कचरा पडू नये याची दक्षता घेतली जाते ) तो घेऊन जातात. बांधकाम किंवा सुतार कामाचे साहित्य बंदिस्त व्हेवीकल मधून आणले जाते.क्राॅकींटच्या कामासाठी रेडीमेड प्रीमिक्स आणला जातो.सारे काम शिस्तबद्ध पणे चालू असते. पण कधी कधी काम वाढले सांगून अधिक रक्कम उकलण्याचाही प्रयत्न केला जातो आणि कामे काही अंशी अपुरी ठेवून दुसरीकडेच सुरुवात करतात. इथून तिथून मानवी स्वभाव सारखाच! कॅनडात असले तरी या युनिवर्सल नियमाला अपवाद कसा असेल? ह्यातली महत्त्वाची बाब म्हणजे स्टुडंट्स वीजा घेऊन आलेले विद्यार्थी अर्थार्जना साठी ही कामे करतात आणि भरपूर कमाई करीत असतात.

येथील ब्राम्पटन शहर म्हणजे मिनी पंजाबच आहे.बहुतांशी शीखांची लोकसंख्या आहे.राजकारणात त्याचे वर्चस्व आहे.मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळते.येथे ढाबे आहेत, गुरूद्वारा आहेत, लंगर चालू असते.मार्केट मध्ये सर्व भारतीय ग्रोसरी,भाजीपाला, मच्छी,मटन,लस्सी आरामात मिळते.क्षणभर आपण कॅनडात आहोत हे विसरायला होते.हे बहुतेक ब्राम्पटन शहरातून येतात आणि नवोदिताना मदतीचा हात पुढे करतात. ही फार मोठी गोष्ट आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
.