मला भावलेल्या शांतताप्रिय कॅनडा: डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 5

कॅनडा वासियांचे अनोखे आणि अलोट असे श्वान प्रेम.

कॅनडा वासियांचे अनोखे आणि अलोट असे श्वान प्रेम.

सर्वात वफादार व प्रामाणिक प्राणी म्हणजे श्वान! महाभारतात स्वर्गात धर्मराज सोबत त्यांचा श्वानच गेला अशी आख्यायिका आहे.

जगभरातील लोक या प्राण्याच्या प्रामाणिकपणावर, त्याच्या निष्टेवर विश्वास ठेवून त्याचे मनस्वी लाड, कौतुक करतात. श्वान हा घरातील सदस्यच बनून जातो.इतके भाग्य त्याच्या वाट्यास येत असते. श्वान पाळणारे त्याची किती आणि कशी काळजी घेतात, त्याचे संगोपन, त्याचे अन्न,औषधे,वेळच्या वेळी द्यावयाची वॅक्सीन,आणि तब्येतीत थोडातरी फरक जाणवला तर लागलीच त्याच्या डाॅक्टराकडे लगेच उपचारार्थ घेऊन जातात.सकाळी किंवा सांयकाळी त्या नैसर्गिक काॅल पासून मोकळीक मिळावी म्हणून फिरावयास ठराविक वेळेतच घेऊन जावे लागते अशा प्रकाराची बडदास्त ठेवावी लागतेच.

ज्यांची ही आपल्या पेट श्वानास तत्परेने सेवा देण्याची मानसिक तयारी असते किंवा आपल्या श्वानाच्या देखभाल करण्यासाठी नोकर चाकर ठेवू शकतात असेच महाभाग या छदांत सहभागी होतात.

जगभरातील श्वान प्रेमी आपली आवड मनापासून जपत असतात. या पाश्र्वभूमीवर कॅनडातील श्वान प्रेमीची मानसिकता कशा प्रकारची असते त्याचा मी माझ्या परीने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा उहापोह येथे करणार आहे तत्पूर्वी छोट्या पप्पीजची ( पिल्लाची ) निवड कशी केली जाते ते समजून घेणेही अधिक इंटरेस्टिंग आहे.


सर्व प्रथम कोणाकडे कोणत्या प्रजातींचा ब्रीड उपलब्ध आहे त्याची माहिती घेतली जाते आणि त्याच्याशी संपर्क साधून पप्पी बुक करतानाच त्याची किंमत ठरविली जाते.बुकींगच्या वेळी काही अ‍ॅडव्हान्सही दिला जातो. पिल्लाचा जन्म झाल्यावर काही दिवसांनी बुकिंग करणार्‍यांस बोलावून त्याला आवडी प्रमाणे जन्मलेल्या पिल्लापैकी निवड करण्याची संधी दिली जाते. त्याचवेळी पिल्लू खरेदी करणार्‍यांकडून एक बाँड लिहून घेतला जातो त्यामध्ये त्या पिल्लाचे संगोपन, देखभाल, वेळचेवेळी औषधोपचार करण्याचे व पिल्लाची कोणत्याही परिस्थितीत हेळसांड केली जाणार नाही,क्रूरतेने त्याच्याशी वागणार नाही अशाप्रकारचे अभिवचन लिहून द्यावे लागते.

सुरुवातीचे वॅक्सीन मालक देतो व ते पिल्लू खातेपिते झाल्यावर इच्छुकाच्या स्वाधीन केले जाते. त्यानंतर त्याचा मालक आवश्यक त्या शिल्लक राहिलेल्या वॅक्सीन,( रेबीजप्रतिबंधक) इंजेक्शन, प्रायमरी ट्रेनिंगही देण्याची व्यवस्थाही याच वेळी केली जाते विशेष म्हणजे नामकरण केले जाते. अशाप्रकारे तो तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा लाडला बनून जातो आणि दिवसागणिक तो घरातील एक मेंबर होऊन जातो.त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत राहातो आणि तुमच्या भावभावना ओळखून तो प्रतिसाद देतो,तुम्हाला आनंदीत करतो.


माझे निरीक्षण येथे नमूद करतो ते असे जगभरातील असंख्य लोक श्वान पालन करतात पण कॅनडात ते प्रमाण सर्वाधिक आहे. कारण नागरिक स्थिर स्थावर झाल्यावरच स्टेटस सिम्बॉल म्हणून ते श्वान आवडीने पालतात. विलक्षण प्रेमाचा वर्षाव करतात,आपल्या मनीच्या भावना त्याच्याशी शेअर करतात. सकाळी किंवा सांयकाळी प्राऊड फिलिंगने फिरावयास नेतात. दुसर्‍या श्वान मालकाशी हितगुज करतात त्याचे श्वान आपल्या बिरादारीच्या जोडीदाराबरोबर प्रेमालाप आळवतात.अशावेळी हातातील श्वानाचे कौतुक दाखविताना त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव पाहाण्यासारखे असतात. यावेळी त्यानी शी केल्यास ती विष्टा प्लास्टिक बॅगेत लागलीच डस्बीन मध्ये टाकून देतात. आपल्याकडे फूटपाथव,सार्वजनिक रस्ते गार्डन त्याच्या या नैसर्गिक विधीसाठीच असतात असा श्वान मालकांचा ठाम मत असावे.असो.विषयांतर नको.


आता आमच्या अवनी आणि नीवाच्या आग्रहाखातर पारूल आणि राहुलने त्याच्या कॅनडातील घरी आणलेल्या लकी विषयी थोडेसे सांगण्याचा मोह काही आवरत नाही.सहा महिन्यांपूर्वीच हा स्विडीश ब्रीडचा पिल्लू भारतीय चलनात Rs 250,000 त्यांनी खरेदी केला.सर्व आवश्यक ते सोपस्कार पूर्ण केले.आता तो सर्वाच्याच ऑखोंका तारा झाला आहे.त्याला क्षणभरही नजरेआड करीत नाहीत. त्यालाही माझ्या नाझींच्या मनीचे भाव लागलीच समजतात. आम्ही आजी आजोबांबरोबर तसेच अवनी नीवाचे नानाजी आणि बरोबरही लेकीचे मेतकूट जमले .फार लाघवी आहे लकी.खरंच तो लकी ठरला आहे.


डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.