मला भावलेला शांतताप्रिय कॅनडा : डॉ भास्कर धाटावकर यांच्या नजरेतून भाग – 13 (नायगारा भाग २)

जगप्रसिद्ध नायगारा फाॅल्स दर्शन कनडाच्या बाजूने (भाग 2)

जगप्रसिद्ध नायगारा फाॅल्स दर्शन कनडाच्या बाजूने (भाग 2)


नायगारा फाॅल्स पाहाण्याचा जास्तीत जास्त आनंद तेथे असलेल्या व्हार्नब्लोअर जलपर्यटन या क्रुझ किंवा बोटीमधल्या निरीक्षणातून अधिक मिळते. ते एक प्रकारचे प्रचंड थ्रील असते अन् तो अनुभवा लागतो. या क्रुझ किंवा बोटींमधून एकाच वेळेस 700 प्रवासी जलपर्यटन करू शकतात. त्या प्रपाती, रौद्र ,अत्यंत प्रवाही जलाशयातून ही महाकाय बोट अक्षरश: पाणी कापीत प्रवाशांच्या अंगावर तुषार उडवित जात असते म्हणूनच येथे बोटी मध्ये चढताना एक रेनकोट देतात. एकाच वेळी पाण्यावरील धुके, दुसरीकडे रेनकोटला न जुमानता आपले सर्वाअंग भिजवणारे बेधडक तुषारांची वृष्टी, प्रवाशांचे आनंदी चित्कार अवघा एकच कल्लोल होतो. ते क्षणा क्षणाला बदलणारे नायगाराचे कधी रौद्र, कधी गुढ, कधी भितीचा थरार तर मध्येच इंद्र धनुच्या रंगाची मुक्त पणे होत असलेली उधळण! या दोन नयनात काय आणि किती टिपून घ्यावे ? किती साठवायचे?

Hornblower Niagara Cruises is operating on the Canadian side


रात्रीचा समय येताच रंगाची उधळण अधिकच वाढते. यावेळी तुमच्याकडे वाॅटर प्रुफ कॅमेरा असेल तरच फोटोग्राफी करावी अन्यथा काही खरे नाही.

Niagra Falls Night Tour


अमेरिका आणि कॅनडाच्या बाजूने ही क्रुझ सेवा उपलब्ध आहे. जगभरातील जी काही मोजकीच अति लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये नायगारा फाॅल्सचा समावेश होतो.


कॅनडाच्या बाजूने फाॅल्स पाहून तुम्ही थांबू नका, नाहीतर तुमची ट्रीप अधुरीच राहील. येथूनच सरळ वीस मिनिटाच्या अंतरावर नायगारा नावाचा एक छोटेखाणी गाव आहे. खरे ते सुंदर टुमदार शहरच आहे. येथील इमारती या व्हिक्टोरियन आर्किटेक्चर शैलीत बांधली आहेत. ती पर्यटकांना आकर्षित करतात. येथे मिळणाऱ्या विविध आईस क्रिम विषयी मागील लेखात लिहीले असल्याने पुनरावृती टाळीत आहे.

Beautiful village Niagara-on-the-Lake


येथील नायगारा पार्क हे आणखीन आर्कषण आहे. सर्वत्र नयनरम्य हिरवळ, विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे आणि अत्यंत कल्पकतेतून निर्माण केलेला फुलांच्या रोपातून तयार केलेले घड्याळ! बोटॅनिकल गार्डन, व्हर्लपूल रॅपिड्स, फुलपाखरू संरक्षण उद्यान इत्यादी आपणांस आनंदीत करतात.

Clock Flower of Niagara Park

येथील सायकलिंग ट्रॅक हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.


डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन